‘यू.पी.आय.’ - एक स्वदेशी व्यवहार प्रणाली

भारतीय अर्थक्षेत्रातील आमूलाग्र क्रांती..!

#बँकिंग आणि ई-कॉमर्स

आपण सर्वांनी केव्हा न केव्हा, कुठे न कुठे ऑनलाईन आर्थिक व्यवहार नक्कीच केलेले आहेत. आजच्या इंटरनेटच्या युगात आर्थिक व्यवहार ऑनलाईन माध्यमातून करणे अधिक सोईचे तर आहेच, पण ते तितकेच सुरक्षित आणि विश्वासार्ह सुद्धा झालेले आहे. अगदी किराणा सामान भरण्यापासून ते विजेच्या बिलापर्यंत, तिकिटाच्या रकमेपासून ते हॉस्पिटलच्या खर्चापर्यंत, सगळीकडे आर्थिक व्यवहार ऑनलाईन माध्यमातून होऊ लागले आहेत. त्यामुळे व्यवहारांचा वेग आणि पारदर्शकता वाढत गेली आहे. गेल्या काही वर्षांत संपूर्ण जगभरातच ऑनलाईन आर्थिक व्यवहार वाढत गेले आहेत. आपला भारतही याला अर्थातच अपवाद राहिलेला नाही. भारतात सुरवातीला ऑनलाईन माध्यमातून आर्थिक व्यवहारांना लोक फारसा प्रतिसाद देत नव्हते, परंतु रिझर्व्ह बँक आणि ‘एन.पी.सी.आय.(NPCI)’ यांच्या प्रयत्नांतून ‘यू.पी.आय.(UPI)’ साकार झाला, आणि त्याने सगळे चित्रच पालटून गेले. या लेखात आपण याच यू.पी.आय. यंत्रणेबद्दल माहिती घेणार आहोत.

यू.पी.आय. चे अधिकृत बोधचिन्ह

सौजन्य : विकिमिडीया कॉमन्स

काय आहे यू.पी.आय ?

यू.पी.आय अर्थात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. ही एक जलद आर्थिक व्यवहार यंत्रणा (Instant Payment System) आहे जी स्मार्टफोन्सवर वापरली जाते आणि एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा देते. ही यंत्रणा वापरकर्त्याच्या बँक खात्याशी संलग्न केलेल्या मोबाईल नंबरचा उपयोग करते. त्याद्वारे बँक खाते स्मार्टफोनशी जोडले जाते. त्यानंतर एका विशिष्ट आभासी पत्त्यावरून, मोबाईल नंबरवरून किंवा थेट बँक खात्याच्या माहितीद्वारे व्यवहार सुरू करता येतात. व्यवहारांना अधिक सोईस्कर आणि वेगवान करण्यासाठी क्यूआर कोड, यू.पी.आय. नंबर, थेट मोबाईल नंबर आणि आधार नंबरवरून पैसे पाठवण्याची सुविधा, तसेच सर्व महत्त्वाच्या बिलांचा आणि मोबाईल रिचार्जचा भरणा करण्याची सोयही यू.पी.आय. यंत्रणा देते. यू.पी.आय. व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी खास पिन नंबर आणि वापरकर्त्याच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी विविध तांत्रिक पद्धतींचा उपयोग करतो.

यू.पी.आय.ची गरज आणि पार्श्वभूमी

पूर्वीपासूनच भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने रोखीच्या व्यवहारांवर आधारलेली होती. सर्व किरकोळ व्यवहार हे रोख स्वरूपातच केले जात असत आणि त्या व्यवहारांचे स्वरूप गुंतागुंतीचे असे. वेगवेगळे व्यवहार, त्यांचे वेगवेगळे निकष, त्यांमधून चाललेला भ्रष्टाचार, सरकारी पैशाचा गैरवापर, नागरिकांची फसवणूक, कागदोपत्री नोंदींचा गोंधळ, बनावट चलन आणि अनधिकृत व्यवहार या सगळ्यांमुळे सामान्य नागरिक आणि सरकारी यंत्रणा त्रस्त झाली. भौतिक स्वरूपातील चलनाचे नेमके दळणवळण कसे आणि कोणाकडे होते, कोणाकडे बेहिशेबी मालमत्ता साठवलेली तर नाही ना, याचा शोध घेणे आणि या संदर्भातील गुन्हे रोखून या सर्व व्यवहारांत एक पारदर्शकता आणि एकसमानता आणणे आवश्यक होते.

यासाठीच रिझर्व्ह बँकेने इंडीयन बँक्स असोसिएशनच्या (IBA) सहकार्याने एप्रिल २००९ मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एन.पी.सी.आय.(NPCI) स्थापन केले. या संस्थेचा उद्देश राष्ट्रीय पातळीवरील सर्व किरकोळ व्यवहारांमध्ये (Retail Payments) एकसमानता आणण्यासाठी एक संघटित यंत्रणा बनवणे हाच होता. मार्च २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने केलेल्या अभ्यासात असे लक्षात आले, की अनेक ठिकाणी ऑनलाईन आणि पारदर्शक व्यवहाराची सोय असूनही, भारतातील एक सामान्य व्यक्ती, तिच्या एका वर्षातील व्यवहारांत केवळ सहा ऑनलाईन व्यवहार करीत होती. याव्यतिरिक्त १४.५ कोटी कुटुंबे बँक खात्यापासून वंचित होती. यात सुधारणा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने २०१२ साली देशातील ऑनलाईन व्यवहारांत वाढ आणि विकास करण्यासाठी एक अधिकृत, वापरास सोपी, सुटसुटीत आणि सुरक्षित व्यवहार व सेटलमेंट प्रणाली विकसित करण्याची घोषणा केली. त्यासाठी चार वर्षांचे धोरण आखण्यात आले आणि अखेरीस ११ एप्रिल २०१६ रोजी यू.पी.आय.ची घोषणा झाली. त्याच वर्षाच्या अखेरीस झालेल्या नोटाबंदीमुळे यू.पी.आय.चा वापर वाढत गेला. लोकांचे रोख रकमेवरचे अवलंबित्व कमी होऊ लागले. यू.पी.आय. सगळीकडे मान्यताप्राप्त झाल्याने आणि त्याच्या वापराच्या सोईमुळे लोक बँक खात्यांकडे आणि ऑनलाईन व्यवहारांकडे वळू लागले. यू.पी.आय.ची निर्मिती, नियंत्रण आणि नियमन एन.पी.सी.आय.द्वारेच केले गेले. हीच संस्था त्याची तांत्रिक बाजूही सांभाळत आहे.

VPA Structure

VPA ची रचना - हा पत्ता ई-मेल पत्त्यासारखा दिसतो

यू.पी.आय.ची वैशिष्ट्ये

यू.पी.आय. आपल्याला स्मार्टफोन्स वरील विविध पेमेंट ॲप्सच्या माध्यमातून वापरता येतो. (जसे की, GPay, PhonePe, Paytm, BHIM इ.) आपल्या स्मार्टफोनलाच प्राथमिकतः व्यवहारांचे साधन म्हणून वापरले जाते. त्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला आपण यू.पी.आय. मध्ये रजिस्टर करतो. त्या नंबरशी संलग्न असणारे बँक खाते यू.पी.आय. शोधून काढतो आणि ते आपल्याला दाखवले जाते. अनेक बँक खातीही संलग्न असू शकतात. आपण आवश्यक ते बँक खाते निवडले की व्यवहार लगेच सुरू होतो. जर आपल्याकडे स्मार्टफोन नसेल, तर यू.पी.आय. वापरण्यासाठी USSD Code (म्हणजे आपण मोबाईलवर बॅलन्स पाहण्यासाठी जसे नंबर वापरतो, तसेच नंबर) वापरता येतात. यू.पी.आय. साठीचा USSD Code *99# असा आहे.

आपल्याला व्यवहार करताना गोपनीय पद्धतीने करता यावेत, यासाठी यू.पी.आय. विशिष्ट आभासी पत्ता वापरतो. (Virtual Payment Address किंवा VPA) त्यामुळे आपल्या बँक खात्याची कोणतीही गोपनीय माहिती समोरच्याला न कळता व्यवहार करता येतो. थेट मोबाईल नंबर टाकूनही पैसे पाठवता येतात. आपण एकापेक्षा अधिक आभासी पत्ते वापरू शकतो. व्यक्ती<-->व्यक्ती, व्यक्ती<-->व्यापारी किंवा व्यक्ती<-->संघटना असे व्यवहार एकाच माध्यमातून होऊ शकतात. आधार नंबरचा उपयोग करूनही व्यवहार करता येतात. याशिवाय यू.पी.आय. क्यू.आर.कोडचा (QR Code) उपयोग करून गोपनीय पद्धतीने व्यवहार करू देतो. क्यू.आर.कोडला आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने स्कॅन करण्याची सुविधा असते. यामुळे आपल्याला आपले आभासी पत्ते (VPAs) सुरक्षित ठेवता येतात. यू.पी.आय. मध्ये स्वतंत्र ‘यू.पी.आय. नंबर’ची संकल्पना (UPI Number) देखील आहे. हा नंबर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. त्याद्वारे देखील पैसे पाठवता येतात. यू.पी.आय. वरून जसे पैसे पाठवले जाऊ शकतात, तसेच ते दुसऱ्याकडे मागताही येतात. त्याला मनी रिक्वेस्ट म्हणतात.

व्यवहारांची सुरक्षितता राखण्यासाठी प्रत्येक यू.पी.आय. आधारित ॲप फोन नंबरची आणि सिमकार्डची माहिती घेतो. त्याद्वारे वापरकर्ता आणि त्याची ओळख राखली जाते. जर नंबर किंवा सिमकार्ड परस्पर बदलले गेले, तर यू.पी.आय. द्वारे व्यवहार करता येत नाही. पुन्हा रजिस्टर करून ओळखीची पुष्टी करावी लागते. याचसोबत यू.पी.आय. चार किंवा सहा अंकी पिन तयार करायला लावतो. प्रत्येक व्यवहाराच्या वेळी या पिनचा उपयोग करून द्विचरण पडताळणी (Two Step Verification) केले जाते. त्यामुळे अनवधानाने अगर अनधिकृतपणे होणारा व्यवहार टाळला जातो.

सर्व बँका, वेगवेगळे ॲप्स, वेगवेगळ्या पेमेंट सेवा या सर्वांना एकत्रितपणे यू.पी.आय. वापरता यावा, यासाठी यू.पी.आय. काही विशिष्ट पेमेंट ए.पी.आय. (Application Programming Interface किंवा API) पुरवतो. त्याच्या साहाय्याने व्यवहारात एकसमानता येते आणि सुरक्षा मानके प्रस्थापित होतात. API ही तांत्रिक संकल्पना नेमकी काय आहे, हे पुढे कधीतरी पाहू.

यू.पी.आय. हा सहकृत (interoperable) आहे. त्याच्या माध्यमातून संकेतस्थळांवर, दुकानांमध्ये, बँकांमध्ये, सरकारी आस्थापनांमध्ये तसेच वैयक्तिक पातळीवरील व्यवहारही करता येतात. याचमुळे आपण नियमित भरावी लागणारी विविध बिले, हप्ते, मोबाईल रिचार्ज आणि इतर सर्व व्यवहार एकाच ठिकाणी, एकाच ॲपमधून करू शकतो.

यू.पी.आय. प्रामुख्याने IMPS (Instant Mobile Payment System) वर आधारलेला आहे.

यू.पी.आय. कसा चालतो ?

यू.पी.आय.ची कार्यप्रणाली थोडी किचकट आहे. त्यामुळे त्याचे कार्य कसे चालते हे समजण्यासाठी आपल्याला प्रथम काही संकल्पना समजून घ्याव्या लागतील:

१) TPAP (Third Party Application Provider) - तृतीयपक्षी एप्लिकेशन सेवा प्रदाते अर्थात आपण वापरतो ते यू.पी.आय. ॲप्स. हे ॲप्स आपण प्रत्यक्ष हाताळत असतो. यांच्या माध्यमातून व्यवहार केले जातात. या ॲप्सना काही विशिष्ट मानके पाळणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होते.

२) PSP (Payment Service Provider) - व्यवहार सेवा प्रदाते वापरकर्त्याच्या ओळखीची आणि व्यवहाराच्या सत्यतेची पडताळणी करतात आणि संबंधित बँका व यू.पी.आय. स्विच यांच्यात संपर्क प्रस्थापित करतात. या PSP मुळेच यू.पी.आय. ॲप्स त्यांचे कार्य करू शकतात. PSP होण्याचा आणि यू.पी.आय. स्विचशी संपर्क करण्याचा अधिकार हा केवळ मोठ्या बँका आणि वित्तीय संस्थांनाच असतो. इतर कंपन्या किंवा लोक ते करू शकत नाहीत. PSP दोन प्रकारचे असतात. एक, जो पैसे भरण्याऱ्याच्या बाजूला काम करतो (Payer PSP) आणि एक, जो पैसे स्वीकारणाऱ्याच्या बाजूला काम करतो. (Payee PSP)

३) UPI Switch - यू.पी.आय. स्विच ही एन.पी.सी.आय. ने स्थापित केलेली एक केंद्रीय यंत्रणा आहे, जी व्यवहार घडवून आणते. ही यंत्रणा एका अतिशय सुरक्षित डेटा सेंटरमध्ये स्थापित केलेली असून तिला अनेक पातळ्यांवर सुरक्षित करण्यात आलेले आहे. तिला UPI Interface असेही म्हणतात.

४) बँका - बँकांचा व्यवहारात प्रत्यक्ष सहभाग असतो. पैसे पाठवणाऱ्याचे आणि ते मिळवणाऱ्याचे, दोघांचेही खाते सक्रिय असावे लागते. काहीवेळा ही खाती एकाच बँकेत असतात किंवा ती वेगवेगळ्या बँकांमध्ये असू शकतात. पैसे ज्या बँकेतून जातात तिला Remitter Bank म्हणतात. तसेच ज्या बँकेत पैसे येणार आहेत तिला Beneficiary Bank म्हणतात.

UPI Transaction Diagram

यू.पी.आय. ने व्यवहार असा होतो..!

आता व्यवहार होतो कसा हे पाहू.


समजा तुम्ही बाजारात आहात आणि एखाद्या दुकानात व्यवहार करण्यासाठी तुम्ही क्यू.आर.कोड स्कॅन केला आहे:

१) त्या क्यू.आर.कोड मधून दुकानदाराचा VPA तुमच्या TPAP ॲपला मिळतो. आता तुम्हाला रक्कम आणि तिचा तपशील घालायला सांगितले जाते. रक्कम आणि तपशील टाईप केल्यानंतर व्यवहार पुढे जातो.


२) त्यानंतर तुम्हाला तुमचा यू.पी.आय. पिन टाकायला सांगितले जाते. काहीवेळा तुम्हाला इतर पिन किंवा पासवर्डसुद्धा टाकावे लागू शकतात. ते तुमच्या पेमेंट ॲप कडून सुरक्षितता राखण्यासाठी सेट केलेले असतात.


३) त्यानंतर ही सर्व माहिती तुमच्या PSP कडे अर्थात Payer PSP कडे जाते. तिथे गेल्यानंतर व्यवहाराची माहिती अधिकृत आहे का, हे तपासले जाते. या माहितीत तुमच्या बँक खात्याची माहितीही असते.


४) पुढे ही माहिती UPI Switch कडे पाठवली जाते.


५) UPI Switch आता पुढील कामे करतो -

i) तो तुमच्या बँकेला व्यवहाराची रक्कम तुमच्या खात्यातून वजा करायची सूचना देतो. (Remitted)

ii) तो दुकानदाराचा VPA त्याच्या PSP कडे, अर्थात Payee PSP कडे पाठवतो. Payee PSP दुकानदाराच्या VPA वरून त्याचे बँक खाते कोणते आहे हे शोधून काढतो.

iii) त्यानंतर UPI Switch दुकानदाराच्या खात्यात रक्कम भरण्याची सूचना त्याच्या बँकेला देतो. (Benefitted)

iv) शेवटी दोन्ही बँका त्यांचे व्यवहार झाल्याचे UPI Switch कडे कळवतात. त्यानंतर UPI Switch तुम्हाला आणि दुकानदाराला व्यवहार झाल्याची सूचना देतो.


हे सर्व काही सेकंदात घडते. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, की केवळ खात्यातील तपशील बदलले जात आहेत. प्रत्यक्ष पैसे पाठवले गेलेले नाहीत. मग पैसे जातात कसे ? त्यासाठी क्लिअरिंग आणि सेटलमेंट (Clearing & Settlement) केले जाते. UPI Switch दर सहा तासांनी बँकांच्या परस्पर व्यवहाराचा हिशेब करतो, ज्याला Clearing म्हणतात. शेवटी बँका ती रक्कम एकमेकांना पाठवतात आणि सर्व व्यवहार पूर्ण होतात. त्याला Settlement म्हणतात.

यू.पी.आय.चे फायदे

१) यू.पी.आय. यंत्रणा ही वापरायला अत्यंत सोपी, सुरक्षित, वेगवान, सहकृत आणि कार्यक्षम आहे. ही आपली स्वदेशी यंत्रणा आहे.

२) द्विचरण पडताळणी केली जात असल्याने अनधिकृत आणि असुरक्षित व्यवहारांना आळा बसतो.

३) स्मार्टफोन आधारित असल्याने यू.पी.आय. कोठेही सोईस्करपणे वापरता येतो.

४) क्रेडिट कार्डवरील आर्थिक मर्यादांपेक्षा यू.पी.आय.ची व्यवहार मर्यादा जास्त असते.

५) यू.पी.आय.चा वापर कोणीही सहज करू शकेल अशी त्याची रचना आहे. त्यामुळे तो थोड्याच काळात लोकप्रिय झाला.

६) यू.पी.आय. वापरास मोफत असल्याने बँक खात्यातून होणाऱ्या व्यवहारासाठी अतिरिक्त फी आकारली जात नाही.


यू.पी.आय.चे तोटे

१) यू.पी.आय. मोबाईल नेटवर्कशिवाय चालवणे अवघड आहे. जिथे नेटवर्क व्यवस्थित नसेल, तिथे व्यवहार करणे अवघड जाते.

२) यू.पी.आय. मोबाईल फोनवरूनच वापरता येणे शक्य आहे. तो इतर यंत्रणांवर चालत नाही.

३) यू.पी.आय.च्या सुरक्षिततेसाठी असणारे पिन कोड्स गुप्त ठेवणे आवश्यक असते. ते जर इतरांना कळले, तर धोका होऊ शकतो.

४) यू.पी.आय.ने केलेला एखादा व्यवहार जर अयशस्वी झाला, आणि जर पैसे गेले असतील, तर ते परत येण्यासाठी ४८ तासांपर्यंत किंवा जास्त वेळ लागू शकतो.

५) बँकांचे सर्व्हर्स सक्रिय असणे व्यवहारासाठी गरजेचे आहे. जर ते काही कारणाने निष्क्रिय होत असतील, तर व्यवहार अयशस्वी होतात.

यू.पी.आय.ची व्यावहारिक सुरक्षितता

१) यू.पी.आय. व्यावहारिक दृष्ट्या अतिशय सुरक्षित आहे. त्यातून होणाऱ्या व्यवहारात शक्यतो पैसे कोठेही अडकू नयेत, अशीच त्याची रचना आहे. जर पैसे अडकले, तर ते कोणत्या पायरीवर अडकले आहेत, त्याची नोंद घेऊन क्लिअरिंग करत असताना ते परत पाठवले जातात.

२) प्रत्येक व्यवहाराचा एक विशिष्ट संदर्भ क्रमांक तयार होतो. त्याद्वारे मुख्य स्विचवरून यशस्वी आणि अयशस्वी झालेल्या व्यवहारांची लगेच नोंद घेत येते.

३) सर्व यू.पी.आय. ॲप्समध्ये तक्रार निवारण करण्याची सोय असणे, आणि ती सक्रिय असणे एन.पी.सी.आय. द्वारे बंधनकारक केले गेले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत नाही.

४) यू.पी.आय.च्या तांत्रिक रचनेला अश्या पद्धतीने घडविण्यात आले आहे की, शक्यतो व्यवहार अयशस्वी होण्याचे प्रमाण कमीत कमी असावे. सध्या हे प्रमाण अगदी १ टक्क्याहूनही कमी आहे. याशिवाय कोणत्या बँकेबरोबर व्यवहार अयशस्वी होत आहेत, कोणता PSP सर्वाधिक व्यस्त आहे, हे पाहून व्यवहाराला पर्यायी यंत्रणेने करण्याची क्षमता TPAP ॲप्समध्ये विकसित केली गेली आहे.

५) TPAP ॲप्स ज्या फोनवर वापरली जात आहेत, त्याच्या सॉफ्टवेअरच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. त्यामुळे असुरक्षित सॉफ्टवेअरवरून व्यवहार केला जात नाही.


या लेखात आपण यू.पी.आय.बद्दल माहिती पाहिली. आपल्या देशात निर्माण झालेली अतिशय क्रांतिकारी, सामान्य माणसाच्या खिशात पोहोचलेली आणि सर्वाधिक यशस्वी ठरलेली ही यंत्रणा भारताच्या अर्थकारणातील आणि विकासातील एक मैलाचा दगड ठरलेली आहे. तिच्यात येत जाणाऱ्या नव्या क्षमतांमुळे ती अधिकाधिक लोकप्रिय झालेली आहे, अगदी परदेशात सुद्धा..! भारताची अर्थक्रांती अशीच वेगाने सुरू राहिली आणि नवनवे देशी तंत्रज्ञान विकसित झाले, तर महासत्ता आणि विश्वगुरू होण्यापासून भारताला कोणीही रोखू शकणार नाही.


या लेखासाठी खालील संदर्भ वापरले गेले:

१) Gochhwal, R. (2017) Unified Payment Interface—An Advancement in Payment Systems. American Journal of Industrial and Business Management, 7, 1174-1191. https://doi.org/10.4236/ajibm.2017.710084 (last retrieved Aug. 17, 2023)

२) Prasanna T.R. (2023) The History of UPI. International Journal of Creative Research Thoughts (IJCRT), Volume 11, Issue 5 May 2023, ISSN: 2320-2882 (last retrieved Aug. 17, 2023)

३) How Do UPI Payments Work ?, Dice India, https://medium.com/dice-india/the-enabling-power-of-upi-payments-4060826c2a16 (last visited Aug. 17, 2023)

या लेखाविषयी आपल्या सूचना/प्रतिक्रिया संपर्क पृष्ठावरून कळवू शकता. आपल्याला हा लेख आवडला तर शेअर नक्की करा..!