टेकमयोसीविषयी

काय आहे टेकमयोसी ? चला जाणून घेऊ..!

टेकमयोसी हा आपल्या रोजच्या जीवनात सहजतेने मिसळून गेलेल्या तंत्रज्ञानाचा आणि त्यात दिवसेंदिवस होत जाणार्‍या बदलांचा आढावा घेणारा मराठी ब्लॉग आहे.


आज आपण सर्वजण एका अशा काळात जगत आहोत, ज्यात मानवजात आपल्या बुद्धीच्या सर्वोच्च क्षमतेला गाठते आहे. आपले राहणीमान, आपले जीवन, आपले ज्ञान, आपले शोध, अवकाशापर्यंत आणि त्याहुनही पलिकडे आपण मारलेली मजल, आपण निर्माण केलेल्या यंत्रणा, आपल्या शरीराच्या आणि मेंदूच्या असाधारण क्षमता, त्यांचा आपण केलेला चपखल वापर.... या सगळ्याच गोष्टी अगदी चमत्कारिक आहेत. सुरुवातीच्या काळात ही मानवजात भटके जीवन जगायची. जंगलांतून इकडून तिकडे फिरत, शिकार करीत, गुहांमध्ये राहून जीवन जगणारा हा मानवप्राणी आज इतक्या संपन्न आणि प्रगत स्थितीत कसा काय येऊ शकला ?


मानवाला असणार्‍या काही नैसर्गिक देणग्या याला नक्कीच कारणीभूत ठरल्या. दोन पायांवर उभे राहून चालण्याची क्षमता, हाताच्या चारी बोटांच्या बरोबर समोर वाकवता येणारा अंगठा आणि त्यामुळे वस्तू पकडण्याचे कौशल्य, स्वरयंत्राची विशिष्ट रचना आणि भाषिक कौशल्ये, विचार करण्याची आणि त्यांच्या अर्थांचे पृथ:करण करण्याची क्षमता, प्रयोगशीलता आणि निष्कर्ष काढण्याची वृत्ती, जिज्ञासा, आणि सर्वांत मुख्य म्हणजे कधीही शांत न बसणारा मेंदू....! सतत विचार करणारा, चंचल असा स्वभाव...! आणि या सर्वांमधून त्याने लावलेले शोध आणि त्यांचा आपल्या जीवनात केलेला अंतर्भाव.... या सर्व गोष्टी मानवाच्या आजच्या संपन्न स्थितीस कारणीभूत आहेत.


मानवाने त्याच्या उत्क्रांतीच्या काळादरम्यान लावलेले शोध अभूतपूर्व ठरले. अग्नीचा शोध, चाकाचा शोध, हत्यारे आणि शस्त्रे, शेतीचा शोध, विटा आणि दगडांची पक्की घरे, भाषा, लेखनकौशल्य, शिक्षण, विविध बौद्धिक शास्त्रे, युद्धकला, ललित कला, तंत्रविद्या आणि वैद्यकशास्त्र हे त्यातील काही उल्लेखनीय आहेत. यात तंत्रविद्येचे महत्वपूर्ण स्थान आहे. तंत्रज्ञानाने मानवाचे जीवन अत्यंत सुलभ आणि समृद्ध केले. आज या सर्व क्षेत्रांमध्ये मानव खूपच पुढे गेला आहे, उत्क्रांतीचा तो काळही खूप मागे निघून गेला आहे; पण यादरम्यान तंत्रज्ञानाने मात्र मानवी जीवनातील या प्रत्येक क्षेत्रात आपले अबाधित आणि अविभाज्य स्थान निर्माण केले आहे. आजच्या काळात तर हे स्थान फारच पक्के झाले आहे. ‘टेकमयोसी’ या शब्दातून हाच अर्थ अभिप्रेत आहे. ‘टेक’ अर्थात ‘टेक्नॉलॉजी’ - ‘तंत्रज्ञान’ आणि ‘मयोसी’ अर्थात ‘मय झालेला’. आज मानवी जीवन तंत्रज्ञानमयी झालेले आहे, हेच यातून सांगायचे आहे. चला तर मग.... या तंत्रज्ञानाच्या दुनियेत प्रवास करायला....