काय असते ‘प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर’ ?

जाणून घ्या सॉफ्टवेअर निर्मितीचा व्यावसायिक दृष्टिकोन

#संगणकशास्त्र

आपण सर्वजण मोबाईल वापरतोच. त्यातल्या त्यात ‘स्मार्टफोन’ वापरतो. स्मार्टफोन्स मधील आकर्षक वैशिष्ट्ये आणि क्षमता त्यांना साधारण मोबाईल फोनपेक्षा अधिक सक्षम बनवतात. आता तर त्यांची लोकप्रियता खरोखरच खूप वाढली आहे. स्मार्टफोनशिवाय आपले पानसुद्धा हलत नाही. स्मार्टफोनमुळे आपण एकमेकांशी अतिशय वेगाने संवाद साधू शकतोच, शिवाय फोटो, गाणी, गेम्स, व्हिडिओज यांचाही आनंद घेतो. यावर कळस म्हणजे इंटरनेट..! इंटरनेटमुळेच आजचा स्मार्टफोन खऱ्या अर्थाने स्मार्ट झालेला आहे. अगदी सोशल मीडियावरून आपल्या जवळच्या व्यक्तींना मेसेज पाठवण्यापासून ते गाडीच्या नॅव्हिगेशनपर्यंत, ऑनलाईन स्ट्रीमिंगपासून ते यु.पी.आय. बँकिंगपर्यंत सगळे काही या इंटरनेटमुळेच चालते. जसा स्मार्टफोन, तसाच कॉम्प्युटर. कॉम्प्युटर शिवाय तर आजचे जग अधूरे आहे. आज कॉम्प्युटरचा वापर नसलेले एखादे अभ्यासक्षेत्र अथवा कार्यक्षेत्र फारच शर्थीच्या प्रयत्नाने सापडेल. आता तर हार्डवेअरच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर एकच होत चालले आहेत. त्याचबरोबर त्यांवर चालणारी कामेही अधिकाधिक संघटित होत चालली आहेत. एवढे सगळे बदल आणि प्रगती पाहिली तर केवळ अवाक व्हायला होते. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की या सर्व प्रगतीचा मूळ कणा कोणता आहे ? 'हार्डवेअर' तर आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची एक गोष्ट आहे जिच्यामुळे या हार्डवेअरमध्ये त्याचा स्मार्टपणा येतो. ती गोष्ट म्हणजे ‘सॉफ्टवेअर’..! सॉफ्टवेअर शिवाय हार्डवेअरमध्ये प्राण येत नाही, असे म्हणायला हरकत नाही. अरे हो! एवढे सगळे बोललो पण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे नेमके काय हेच आपण पाहिले नाही..!

A Computer Motherboard

कॉम्प्युटरचा मदरबोर्ड - हार्डवेअरचे एक उदाहरण

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर

हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा स्पर्श करता येतो, असा भौतिक भाग. मदरबोर्ड, बॅटरी, डिस्प्ले असे शब्द मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात आपल्या कानावर पडतात. तसेच कॉम्प्युटरच्या दुकानात गेल्यावर रॅम, हार्ड डिस्क, मॉनिटर, पॉवर सप्लाय असे शब्द आपण ऐकतो. माऊस आणि कीबोर्ड तर आहेतच. हे सर्व हार्डवेअर आहेत. याउलट सॉफ्टवेअर म्हणजे असा भाग, ज्याला स्पर्श करता येत नाही. भौतिक दृष्ट्या हाताळता येत नाही. आपण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हार्डवेअरशी संवाद साधतो आणि आपले इच्छित कार्य त्याच्याकडून करवून घेतो.

सॉफ्टवेअरची निर्मिती

ज्याप्रमाणे आपण कागदावर निबंध, कविता लिहितो अगदी त्याच प्रमाणे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरवर लिहिले जाते. या लिखाणातून आपण कॉम्प्युटरला तार्किक सूचना देतो. त्यासाठी आपण विशिष्ट प्रकारच्या संगणकीय भाषा वापरतो ज्यांना 'प्रोग्रामिंग लँग्वेज' म्हणतात. कॉम्प्युटरला त्याच्या तार्किक भाषेतून सूचना देण्याच्या प्रक्रियेस ‘प्रोग्रामिंग’ म्हणतात. प्रोग्रामिंग करताना ज्या सूचना लिहिल्या जातात त्यांना मूळ सूचना, अर्थात ‘सोर्स कोड’ असे म्हणतात. हा सोर्स कोड हार्डवेअरवर चालण्यासाठी त्याला हार्डवेअरच्या मूलभूत भाषांमध्ये भाषांतरित करावे लागते. त्यांना ‘मशीन लँग्वेज’ असे म्हणतात. हे भाषांतराचे काम ‘कंपायलर’ किंवा ‘इंटरप्रेटर’ करतात. अश्या प्रकारे सॉफ्टवेअर एका सामान्य शब्दसमूहाच्या रूपाने जन्म घेते आणि भाषांतरित करून हार्डवेअरवर प्रतिस्थापित केले जाते. यालाच ‘इंस्टॉलेशन’ म्हणतात. ही सर्व प्रक्रिया फार किचकट असल्याने त्याबद्दल आपण एखाद्या स्वतंत्र लेखात विस्ताराने पाहू. सध्या केवळ सॉफ्टवेअरची मूलभूत ओळख आपल्याला पुरेशी आहे.

HTML Code

हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज अर्थात HTML भाषेतील कोडचे उदाहरण. ही भाषा वेब ब्राउझर्समार्फत वेबसाईट्स दाखवण्यासाठी वापरली जाते.

सॉफ्टवेअरचे प्रकार

सॉफ्टवेअरचे मुख्यतः तीन प्रकार आहेत :

१) सिस्टीम सॉफ्टवेअर - हे सॉफ्टवेअर म्हणजे सर्वात मूलभूत सॉफ्टवेअर ज्याच्यामुळे हार्डवेअरशी संवाद करणे शक्य होते. इतर सर्व सॉफ्टवेअर प्रणाली यांच्यामुळेच चालतात. उदा. आपल्या रोजच्या वापरातला ‘अँड्राईड’..! अँड्रॉईड ही एक ‘ऑपरेटिंग सिस्टीम’, अर्थात सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. ती आपल्या फोनमध्ये असल्यामुळे आपण विविध ॲप्स, इंटरनेट, ब्लूटूथ, कॅमेरा, नेटवर्क आणि आपल्या सर्व फाईल्स वापरू शकतो. या सगळ्याला व्यवस्थापित करण्याचे काम सिस्टीम सॉफ्टवेअर करते. आणखी उदाहरणे म्हणजे मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम, ग्नू/लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम, मॅक ओ.एस. इत्यादी.


२) ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर - हे सॉफ्टवेअर एखादे विशिष्ट काम करण्यासाठी तयार केले जाते. जसे की आपण दस्तऐवज तयार करण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट वर्ड’ वापरतो. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. इंटरनेट ब्राऊझिंग वापरला जाणारा ‘क्रोम ब्राउझर’ हेही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. आपण आज मोबाईलवर वापरत असलेले विविध ‘ॲप्स’ म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत.


३) युटीलिटी सॉफ्टवेअर - हे सॉफ्टवेअर सिस्टिम आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे काम नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. जसे की आपल्या अँड्रॉईड फोनमधील ‘फाईल मॅनेजर’. तो आपल्याला आपल्या फाईल्स व्यवस्थापित करायला मदत करतो. ‘सेटिंग्ज ॲप’मधून आपण फोनचे सेटिंग्ज बदलू शकतो. तेही युटीलिटी सॉफ्टवेअर आहे.

Cyber Fingerprint

जागरूक वापरकर्ते म्हणून आपण आपले इंटरनेटवरील व्यवहार जपून केले पाहिजेत.

काय आहे ‘प्रोप्रायटरी’ची संकल्पना

आपण आज जे सॉफ्टवेअर्स वापरतो, त्यातले बहुतांशी सॉफ्टवेअर्स हे कोणत्या ना कोणत्या तरी कंपन्यांनी बनवलेले आहेत. जसेकी आपण नेहमी वापरतो ती मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेली आहे. अश्या अनेक कंपन्या अथवा खाजगी संस्था किंवा संगणक अभियंते त्यांनी तयार केलेले सॉफ्टवेअर इंटरनेट वरून विकतात आणि त्यातून व्यवसाय करतात. हेच सॉफ्टवेअर वापरकर्ते म्हणजे आपण विकत घेतो आणि वापरतो. हे सॉफ्टवेअर व्यवसायाच्याच दृष्टीने तयार केलेले असल्याने त्याला ‘कमर्शिअल’ किंवा ‘प्रोप्रायटरी’ सॉफ्टवेअर म्हणतात.

वर म्हटल्याप्रमाणे सॉफ्टवेअर सोर्स कोडच्या रुपात जन्म घेते. कमर्शिअल किंवा प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचा हाच सोर्स कोड त्याच्या निर्मात्यांकडून अगदी गुप्त ठेवला जातो. अर्थातच तो सॉफ्टवेअरचा गाभा असल्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून संरक्षित असतो. त्याला सर्वाधिकार आणि बौद्धिक मालमत्तेच्या कायद्याने संरक्षण असते. ज्यावेळी तो सोर्स कोड हार्डवेअरच्या भाषेत भाषांतरित केला जातो त्यावेळी त्यातून निर्माण होणाऱ्या फाईल्सना ‘बायनरी फाईल्स’ म्हटले जाते. आपण त्यांना ‘सेटअप फाईल्स’ म्हणूनही ओळखतो. (उदा. EXE फाईल किंवा APK फाईल)

या बायनरीज देखील कायद्याने संरक्षित असतात. त्यासाठीच कोणतेही सॉफ्टवेअर हे बेकायदेशीरपणे डाऊनलोड करून वापरू नये, असे सांगितले जाते. कोणत्याही सॉफ्टवेअरचा त्याचा परवाना, अर्थात लायसेन्स घेऊनच वापर करावा, असे सांगितले जाते. त्या परवान्यामध्ये सांगितलेल्या अटी आणि शर्ती (Terms and Conditions किंवा End User License Agreement अर्थात ‘EULA’) आपण मान्य करतो, म्हणून आपण ते सॉफ्टवेअर वापरू शकतो. आपल्यापैकी बहुतांश लोक हे लायसेन्स कधीही वाचत नाहीत तर त्याला थेट मान्य करून पुढे जातात. पण त्यामुळे आपल्यावर कोणत्या अटी लादल्या जात आहेत का ? आपले काही अधिकार हिरावले जात आहेत का ? आपली गोपनीय माहिती सुरक्षित आहे का ? सॉफ्टवेअरचा निर्माता या सर्व गोष्टींची जबाबदारी व्यवस्थितपणे घेतोय का ? याचा विचार होत नाही. यामुळे वापरकर्ते म्हणून आपण अडचणीत येऊ शकतो. आपल्याकडून जर त्या सॉफ्टवेअरचा बेकायदेशीर किंवा अटींचा भंग करून वापर झाला, तर आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

आजच्या इंटरनेटच्या युगात आपण आपल्या माहितीच्या अर्थात डेटाच्या संरक्षणाबाबत विशेष जागरूक असले पाहिजे. इंटरनेटवरील आपल्या व्यवहारात (Cyber Behaviour) आपण सतर्क राहिले पाहिजे. आपल्या कॉम्प्युटर आणि मोबाईल डिव्हाईसेसच्या सुरक्षेबाबत आपण काळजी घेतली पाहिजे. नेमके हेच आपल्याकडून घडत नाही आणि आपण अडचणीत सापडतो. खरोखरच या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरच्या व्यवसायात आपण कितपत सुरक्षित आहोत ? आपली माहिती आणि डिव्हाईसची सुरक्षितता कितपत राखली जाते ? चला, जाणून घेऊया त्याच्या फायद्या-तोट्यांबद्दल..!


प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचे फायदे

१) प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कॉम्प्युटरवर तसेच स्मार्टफोनवर व्यवस्थित चालावे यासाठी त्याच्या अनेक चाचण्या घेऊन त्याच्यातल्या त्रुटी वेळोवेळी दुरुस्त केल्या जातात. (बग फिक्सिंग) त्या अपडेट्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवल्या जातात. त्या अपडेट्स ठराविक वेळी पोहोचवण्याची निर्माता हमी देतो.

२) जर आपल्याला सॉफ्टवेअर वापरताना अडचणी आल्या तर आपण मूळ निर्मात्याशी संपर्क करून आपली अडचण सोडवू शकतो. त्यासाठी सपोर्ट म्हणजेच सेवा देण्याचे निर्माता मान्य करतो आणि त्यासाठी माध्यमही पुरवतो.

३) सॉफ्टवेअर मध्ये नवीन फिचर्स आणि व्हर्जन्स निर्माण केले जातात आणि ते आपल्या मूळ लायसेन्समधूनच किंवा स्वतंत्र लायसेन्सची फी घेऊन आपल्यापर्यंत पोहचवले जातात.

४) प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर बऱ्याच ठिकाणी वापर होत असल्यामुळे अधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यासाठी अनेक माध्यमांतून सपोर्ट उपलब्ध असतो.

५) प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरमध्ये वापरकर्त्याच्या अनुभवाची विशेष काळजी घेतली जाते. (Better User Experience) त्यामुळे ते वापरायला सोपे आणि सुटसुटीत असते.

६) सॉफ्टवेअर निर्माते सुरक्षितता आणि माहितीच्या विनिमयावर सातत्याने संशोधन करतात. त्यामुळे सॉफ्टवेअरला अधिकाधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवता येते.

७) मोठमोठ्या संस्थांसाठी आणि सार्वजनिक आस्थापनांसाठी विशेष सेवा उपलब्ध असतात. उदा. नव्या सॉफ्टवेअर फिचर्सचे मोफत प्रशिक्षण आणि समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष तत्पर सेवा इत्यादी.

८) व्यावसायिक दृष्टीने सॉफ्टवेअर पुरवले जात असल्याने त्याच्या उपलब्धतेची आणि कार्यकुशलतेची वेळोवेळी खातरजमा करून त्रुटी सोडवल्या जातात. हे विशेषकरून ऑनलाईन सेवांना लागू पडते.

९) प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर निर्मितीसाठी कुशल मनुष्यबळाची प्रचंड आवश्यकता असते. त्यामुळे हे व्यावसायिक क्षेत्र रोजगार निर्मिती करते.


प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचे तोटे

१) प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरमधील त्रुटी अर्थात बग्ज निर्माणकर्ता त्याच्या सोईने आणि व्यावसायिक गरजेनुसार सोडवतो. शेवटी तो एक व्यावसायिक आहे. त्यामुळे त्यावर लवकर अपडेट येईल किंवा नाही, हे सांगता येत नाही. निर्माणकर्ता अटी आणि शर्ती केव्हाही त्याच्या सोईनुसार बदलू शकतो. त्यामुळेच कधीकधी आपल्या सॉफ्टवेअरला मिळणाऱ्या अपडेट्स अचानक थांबतात.

२) निर्माणकर्त्याने पुरवलेली सेवा (सपोर्ट) माध्यमे अखंडितपणे चालू असतीलच असे नाही. कधीकधी व्यावसायिक किंवा तांत्रिक समस्यांमुळे ही माध्यमे निष्क्रिय झालेली असतात. त्यामुळे वापरकर्ता अडचणीत सापडू शकतो.

३) सॉफ्टवेअरचे नवे व्हर्जन्स किंवा नवे फिचर्स महाग असू शकतात. त्यासाठी भरमसाठ लायसेन्स फी भरावी लागू शकते. ती न भरल्यास नवे व्हर्जन मिळत नाही, आणि जुने व्हर्जन निष्क्रिय होऊ शकते.

४) प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर जरी लोकप्रिय असले, तरी त्यामुळेच त्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. सायबर गुन्हेगार या सॉफ्टवेअर मधील त्रुटींचा फायदा घेऊन त्यातून माहितीची चोरी करू शकतात. या त्रुटी लवकर समोर आल्या नाहीत, तर वापरकर्त्याची गोपनीयता धोक्यात येते.

५) सर्वच प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरायला सोईचे असतील असे नाही. काहीवेळा अगदी बारीकसारीक त्रुटींमुळे एखादे सामान्य फिचरदेखील वापरणे अशक्य होते. याचा आपल्याला कधी ना कधी अनुभव येतोच.

६) प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर निर्माते जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने सॉफ्टवेअर मध्ये असा कोड देखील टाकू शकतात, जो वापरकर्त्याची माहिती तृतीयपक्षी लोकांकडे पाठवू शकतो, किंवा त्याचा गैरवापर करतो. अश्या वेळी वापरकर्त्याच्या अधिकारांचे उल्लंघन होते. याबद्दल निर्माते त्यांच्या अटी आणि शर्तींमध्ये माहिती देतीलच असे नाही. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता धूसर होते.

७) कधीकधी प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर अनपेक्षितपणे कार्य करते. त्यामुळे झालेल्या नुकसानाची निर्माता जबाबदारी घेत नाही.

८) प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरमधून आपल्या माहितीवर होणारी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक नसते. त्यामुळे नेमके काय घडत आहे हे शोधून काढणे अवघड असते. निर्माता त्याच्या सॉफ्टवेअरची संपूर्ण कार्यपद्धती आणि त्यातील खाचखळगे उघड करत नाही.

९) प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरमध्ये वापरकर्त्याला आपल्या सोईनुसार बदल करता येत नाहीत. निर्मात्याकडून केवळ बायनरी फाईल्सच प्रकाशित केल्या जातात. या बायनरीज मधून त्याचा सोर्स कोड मिळवता येत नाही. त्यामुळे वापरकर्त्याला पूर्ण पैसे देऊनही सॉफ्टवेअरचा संपूर्ण ताबा मिळत नाही.

१०) कायदेशीर बंधनांमुळे वापरकर्ते सॉफ्टवेअरचा पूर्ण क्षमतेने आणि मुक्तपणे वापर करू शकत नाहीत. त्यांना निर्मात्याच्या अटींना बांधील राहावे लागते. बायनरी फाईलवर कोणतीही प्रक्रिया करण्यावर पूर्णतः निबंध असतात. असे केल्यास, तसेच विनापरवाना सॉफ्टवेअर वापरल्यास भरमसाठ दंड ठोठावला जाऊ शकतो आणि कडक कारवाई होते.


या लेखात आपण पाहिले की प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरची संकल्पना नेमकी काय आहे. त्याचे फायदे-तोटेही आपण पाहिले. ही संकल्पना समजल्यावर आपल्याला हे दिसून येते की प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर हे व्यवसायाच्याच दृष्टीने निर्माण केलेले आहे आणि त्याचा मुक्तपणे वापर अशक्य आहे. प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचे फायदे अर्थातच आहेत; पण प्रसंगी नफ्याच्या लालसेने वापरकर्त्यांना धोक्यात टाकले जाण्याची शक्यता असते. यातून सायबर समस्या निर्माण होऊ शकतात आणि गुन्हेही घडतात. असे होऊ नये म्हणून निर्माते आणि वापरकर्ते या दोघांनीही सायबर सुरक्षेचे नियम पाळून जबाबदार व्यवहार केला पाहिजे. व्यवसाय करण्याबरोबरच सामाजिकदृष्ट्या प्रगतीकारक आणि सुरक्षित सॉफ्टवेअर निर्माण करण्याचे काम सॉफ्टवेअर निर्मात्यांनी केले पाहिजे.


आपण या लेखात प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचे तोटे पाहताना त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा देखील आढावा घेतला. याच समस्यांवर मात करण्यासाठी ‘फ्री-लिबरे/ओपन सोर्स’ अर्थात FLOSS ही संकल्पना आली आहे. ही संकल्पना पुढील लेखात पाहू.


या लेखात तुम्ही एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली असेल. ती म्हणजे इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर. असे करण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. बहुतेक सर्वच संगणकशास्त्रीय संकल्पना या मूळच्या पाश्चात्य आहेत. त्यामुळे त्यांचे पारिभाषिक शब्दही पाश्चात्य भाषांमध्ये, बहुतकरून इंग्रजीमध्ये आहेत. या संकल्पना जशाच्या तश्याच आपल्याकडे आलेल्या असल्याने आपल्याही व्यवहारात मूळ इंग्रजी शब्दच प्रचलित आहेत. अर्थातच या संकल्पनांना पर्यायी मराठी शब्द नाहीत, असे नाही. परंतु बऱ्याचदा त्यांमधून प्रभावी अर्थनिष्पत्ती होत नाही, शिवाय त्यातील बरेच शब्द व्यवहारात प्रचलित नाहीत. त्यामुळे संकल्पनांचा अर्थ सुस्पष्टपणे समजावा, या हेतूने थेट इंग्रजी शब्द केवळ लिप्यंतरण करून येथे वापरले आहेत. तरीही, या संकल्पनांना पर्यायी मराठी शब्द शोधून अथवा निर्माण करून त्याचा एक शब्दकोश एका स्वतंत्र पृष्ठामधून प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान स्वागतार्ह आहे.


या लेखासाठी पुढील संदर्भ वापरले गेले:

१.“Open-Source vs. Proprietary Software Pros and Cons”, Optimus Information, https://www.optimusinfo.com/downloads/white-paper/open-source-vs-proprietary-software-pros-and-cons.pdf, (last visited Jul. 17, 2023)

२.“Proprietary Software Is Often Malware”, Free Software Foundation, https://www.gnu.org/proprietary/proprietary.en.html, (last visited Jul. 17, 2023)

३.“Ethical, legal, cultural and environmental concerns”, BBC Bitesize, https://www.bbc.co.uk/bitesize/guides/zhx26yc/revision/11, (last visited Jul. 17, 2023)

या लेखाविषयी आपल्या सूचना/प्रतिक्रिया संपर्क पृष्ठावरून कळवू शकता. आपल्याला हा लेख आवडला तर शेअर नक्की करा..!