फ्री-लिबरे-ओपन सोर्स सॉफ्टवेअर (FLOSS)

सॉफ्टवेअर निर्मितीची ‘लोकशाही’..!

#संगणकशास्त्र

काय असते ‘प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर’ ? या लेखात आपण प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरची संकल्पना पाहिली. त्याचबरोबर सॉफ्टवेअर निर्मितीच्या इतर काही मूलभूत संकल्पनाही पाहिल्या. प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर हा सॉफ्टवेअर निर्मितीचा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. त्याच माध्यमातून मोठे ‘सॉफ्टवेअर मार्केट’ उभे राहिले आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. परंतु या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरमुळे जसे अनेक फायदे होतात तसेच अनेक तोटेही होतात. तेही आपण त्याच लेखात पाहिले. आता आपण प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरच्याबाबतीत निर्माण होणाऱ्या तांत्रिक तसेच कायदेशीर अडचणी सामाजिक चळवळीतून कशा प्रकारे सोडवल्या गेल्या, ते पाहणार आहोत. ही चळवळ म्हणजे ‘फ्री सॉफ्टवेअर चळवळ’. यातूनच पुढे आलेला सॉफ्टवेअर निर्मितीचा नवा दृष्टिकोन म्हणजे ‘फ्री-लिबरे-ओपन सोर्स सॉफ्टवेअर’ अर्थात ‘फ्लॉस (FLOSS)’ सॉफ्टवेअर..!

फ्री सॉफ्टवेअर चळवळ (The Free Software Movement)

फ्री सॉफ्टवेअर चळवळ ही एक सामाजिक चळवळ आहे, जिच्या माध्यमातून वापरकर्त्यांना सॉफ्टवेअर वापरण्याबाबत काही मूलभूत स्वातंत्र्ये दिली जातात/घेता येतात. त्यांमध्ये त्या सॉफ्टवेअरच्या रचनेचा, त्याच्या सोर्स कोडचा अभ्यास करण्याचे, त्याच्यामध्ये हवे असतील ते बदल करण्याचे आणि त्याचे इतर वापरकर्त्यांना वाटप करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट आहे. याचाच अर्थ असा, की येथे ‘फ्री’ हा शब्द ‘मोफत’ या अर्थाने न येता, तो ‘मुक्त/निर्बंधमुक्त’ या अर्थाने आला आहे. ‘लिबरे’ या स्पॅनिश शब्दाचाही अर्थ ‘मुक्त’ असाच होतो. फ्री सॉफ्टवेअर चळवळीतून वापरकर्त्यांना दिलेली चार मूलभूत स्वातंत्र्ये खालीलप्रमाणे आहेत:


१) सॉफ्टवेअर वापरकर्त्याच्या मनाप्रमाणे, कोणत्याही इच्छित कार्याकरिता वापरू देण्याचे स्वातंत्र्य. (शून्यावे स्वातंत्र्य)

२) सॉफ्टवेअरच्या रचनेचा आणि कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यामध्ये इच्छेप्रमाणे बदल करून ते कॉम्प्युटरवर वापरू देण्याचे स्वातंत्र्य. अर्थातच त्यासाठी सोर्स कोड उपलब्ध करून दिलेला असणे गरजेचे आहे. (पहिले स्वातंत्र्य)

३) सॉफ्टवेअरचे इतर वापरकर्त्यांना वाटप करू देण्याचे स्वातंत्र्य. (दुसरे स्वातंत्र्य)

४) वापरकर्त्याने स्वतःसाठी बदल केलेले सॉफ्टवेअर इतरांना मुक्तपणे वाटू देण्याचे स्वातंत्र्य, जेणेकरून त्या बदलांचा इतर वापरकर्त्यांना देखील उपयोग करता यावा. अर्थातच बदल केलेल्या सॉफ्टवेअरला त्याच्या बदललेल्या सोर्स कोडसह वाटणे गरजेचे आहे. (तिसरे स्वातंत्र्य)

The GNU Head

ग्नू ऑपरेटिंग सिस्टिमची ओळख असणारे दि ग्नू हेड

(https://www.gnu.org/)

फ्री सॉफ्टवेअर चळवळीची सुरवात १९८३ साली रिचर्ड मॅथ्यू स्टॉलमन या संगणकशास्त्रज्ञांनी केली. अमेरिकेतील ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब’मध्ये काम करत असताना त्यांनी ‘ग्नू प्रोजेक्ट’ (GNU's Not Unix) सुरू केला, ग्नू प्रोजेक्टचा उद्देश त्यावेळच्या प्रोप्रायटरी असणाऱ्या ‘युनिक्स ऑपरेटिंग सिस्टिम’ला एक मुक्त पर्याय उपलब्ध करून देणे, हा होता. पण मुळात ही मुक्ततेची गरज का भासली ?

५० आणि ६० च्या दशकांत सॉफ्टवेअरचे आजच्या काळाप्रमाणे ‘स्वतंत्र अस्तित्व’ नव्हते. सॉफ्टवेअर निर्मिती मुख्यतः विद्यापीठांमध्ये आणि मोजक्या कंपन्यांमध्ये परस्पर सहकार्याने चालत असे. सॉफ्टवेअर हे समाजासाठी मुक्तपणे उपलब्ध करून दिले जात असे. हार्डवेअर कंपन्या सॉफ्टवेअरच्या मशीन कोड(बायनरी)सह सोर्स कोडही मुक्तपणे देत असत. त्याच माध्यमातून वापरकर्ते आपल्या वैयक्तिक गरजेनुसार सॉफ्टवेअर मध्ये बदल करीत होते आणि त्याला मुक्तपणे वाटतही होते. विद्यापीठांची संस्कृती विद्या वाटप करण्याची असल्याने त्यांनी तयार केलेले सॉफ्टवेअर देखील ते मुक्ततेने वाटत असत. त्यातूनच नवनिर्मिती वाढीस लागली आणि सॉफ्टवेअरमधील त्रुटी आणि मर्यादा सोडवल्या जाण्याचे नवे मार्ग उपलब्ध झाले. कोणतीही व्यक्ती सॉफ्टवेअरच्या सोर्स कोड मध्ये बदल करू शकत होती. हार्डवेअर निर्मात्यांनीदेखील सामान्य वापरकर्त्यांकडून बदल केलेला सोर्स कोड स्वीकारणे सुरू केले. तो मोकळेपणाने इतरांना वाटण्याची परवानगी दिली. त्या काळी या सॉफ्टवेअरला ‘बंडल्ड सॉफ्टवेअर’ म्हटले जात असे. या सर्वांमधून एक नवीन संस्कृती उदयाला आली, जिला ‘हॅकिंग कल्चर’ म्हटले गेले. ‘हॅकिंग’ अर्थात बंडल्ड सॉफ्टवेअरच्या सोर्स कोडचा आणि कार्यप्रणालीचा अभ्यास करून त्याच्या मर्यादांवर मात करण्यासाठी त्याला सुधारणे. यामुळे सॉफ्टवेअर वापरकर्त्याच्या नियंत्रणात येते, आणि त्याला त्याच्या मनाप्रमाणे त्याचा उपयोग करता येतो. ही संस्कृती सामाजिक प्रगतीला आणि बौद्धिक स्वातंत्र्याला पोषक होती.

(सायबर गुन्ह्यांमध्ये केले जाणारे ‘हॅकिंग’ ही एक भिन्न संकल्पना आहे. त्याबद्दल नंतर पाहू.)


परंतु, ६० च्या दशकाच्या उत्तरार्धात, ऑपरेटिंग सिस्टिम्स आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये बरेच संशोधन होऊ लागले आणि प्रगती सुरू झाली. हार्डवेअर बरोबर मिळणाऱ्या बंडल्ड सॉफ्टवेअर बरोबर स्पर्धा करणारी स्वतंत्र सॉफ्टवेअर उत्पादने येऊ लागली. सॉफ्टवेअरची स्वतंत्रपणे निर्मिती करून आणि स्वतंत्रपणे बाजारातून विक्री करून त्यातून पैसे मिळवले जाऊ शकतात, हा व्यावसायिक विचार वाढीस लागला. पूर्वी सॉफ्टवेअर मुक्तपणे दिल्यामुळे जो तोटा सोसावा लागत असे, तो भरून निघू लागला. अश्याच दृष्टीकोनातून युनिक्स ऑपरेटिंग सिस्टिमचा उदय झाला. ७० च्या दशकात निर्माण झालेली ही ऑपरेटिंग सिस्टिम सुरवातीला मोफत उपलब्ध करून देण्यात आली परंतु तिच्यामध्ये कोणताही बदल करण्यावर निर्बंध होते. त्याच दशकाच्या उत्तरार्धात मात्र हे निर्बंध वाढत गेले आणि ही ऑपरेटिंग सिस्टिम महागड्या किमतीला विकली जाऊ लागली. कायदेशीर निर्बंध अधिक कडक होत गेले.

यामुळे मुक्तपणे होणारी सॉफ्टवेअरची निर्मिती आणि त्यातून होणाऱ्या प्रयोगांवर आळा बसला. अमेरिकेत सॉफ्टवेअरवर सर्वाधिकार, अर्थात ‘कॉपीराईट’ लावण्याची परवानगी नव्हती. परंतु १९७४ साली झालेल्या ‘CONTU’ निर्णयामुळे आणि कोर्टाच्या काही निकालांमुळे, सॉफ्टवेअरसाठी कॉपीराईट घेता येऊ लागला. त्यातून प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वाढत गेले. सॉफ्टवेअर केवळ बायनरी स्वरूपात मिळू लागले आणि सोर्स कोड मिळणे बंद झाले. त्यामुळे स्टॉलमन व्यथित झाले. त्यांनी युनिक्सच्याच तोडीची एक ऑपरेटिंग सिस्टीम निर्माण करण्याची योजना आखली आणि तिला फ्री सॉफ्टवेअर चळवळीच्या सर्व स्वातंत्र्यांसह उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. हीच ऑपरेटिंग सिस्टिम ‘ग्नू’ (GNU) म्हणून ओळखली गेली. पुढे १९८५ साली त्यांनी या चळवळीच्या वाटचालीसाठी ‘फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन’ (FSF) ही संस्था सुरू केली. ही संस्था फ्री सॉफ्टवेअर चळवळीचे नेतृत्व आणि प्रसार करते. सॉफ्टवेअर मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे स्वतंत्र ‘मुक्त परवाने’ (Free Software Licenses) या संस्थेच्या माध्यमातून निर्माण करण्यात आले. मुक्त स्वरूपात सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी आणि वाटपासाठी ही संस्था प्रोत्साहन देते आणि त्या संदर्भातील मानकेदेखील ठरवते.

‘कॉपीलेफ्ट’ची संकल्पना

कोणत्याही निर्मात्याला सॉफ्टवेअरच्या निर्मिती कार्याकरिता सर्वाधिकार संरक्षण आणि श्रेय घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी ‘सॉफ्टवेअर कॉपीराईट’ ही संकल्पना आली आहे. सर्वाधिकाराने सुरक्षित असणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये निर्मात्याच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही बदल करता येत नाहीत. याचाच अर्थ सोर्स कोड पाहता येत नाही.

पण, जर असे सॉफ्टवेअर ‘फ्री सॉफ्टवेअर’ म्हणून प्रकाशित करायचे असेल, तर सोर्स कोडमधील बदल आणि निर्मात्याचे सर्वाधिकार संरक्षण, या दोन्ही गोष्टी एकत्र कशा होतील ? त्यासाठी वेगळा कॉपीराईट लागेल, ज्यामध्ये निर्मात्याचे हक्क आणि वापरकर्त्यांचे सोर्स कोड मध्ये बदल करण्याचे स्वातंत्र्य, या दोन्ही गोष्टी एकत्र असतील. याचसाठीची कायदेशीर संकल्पना म्हणजे ‘कॉपीलेफ्ट’. कॉपीलेफ्टमध्ये निर्मात्याला सॉफ्टवेअरवर कॉपीराईट संरक्षण अर्थात निर्मितीचे श्रेय आणि अधिकार मिळतात; परंतु इतर वापरकर्त्यांना सोर्स कोड मिळतो. ज्यात ते बदल करू शकतात. त्यामुळे मूळ निर्मात्याला श्रेयही मिळते, आणि वापरकर्त्यांना, वापराची मुक्तता..! कोणताही वापरकर्ता बदल केलेल्या सॉफ्टवेअरवर हक्क सांगू शकत नाही. कारण तो हक्क मूळ निर्मात्याचाच राहतो.

Copyleft Symbol

कॉपीलेफ्ट चिन्ह

काय आहे ओपन सोर्स ?

फ्री सॉफ्टवेअरच्याच धर्तीवर असणारी दुसरी कल्पना म्हणजे ‘ओपन सोर्स’. परंतु ओपन सोर्स ही सामाजिक चळवळ नाही. तो सॉफ्टवेअर निर्मितीचा व्यावहारिक दृष्टिकोन आहे. याचाच अर्थ असा की फ्री सॉफ्टवेअर मधील ‘मुक्ततेची संकल्पना’ या दृष्टिकोनात आहेच असे नाही, परंतु सोर्स कोड आणि त्यातील बदलांची मात्र तरतूद आहे. असे सॉफ्टवेअर स्वतंत्र ‘ओपन सोर्स परवान्यांअंतर्गत’ (Open Source Licenses) प्रकाशित केले जाते. या परवान्यांनुसार सोर्स कोड खुला करून देणे आवश्यक असते. ज्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड खुला करून दिलेला असतो, त्याला ‘ओपन सोर्स सॉफ्टवेअर’ म्हणतात. पण केवळ सोर्स कोड बदलता आला म्हणून सॉफ्टवेअर ओपन सोर्स होत नाही. त्यासाठी त्याचे पुनर्वाटप देखील निर्बंधरहित असणे आवश्यक आहे, अर्थात बदल केलेली नवी आवृत्ती आणि त्याचा सोर्स कोड देखील मुक्तपणे वाटता आला पाहिजे. त्यासाठी प्रामुख्याने मूळ आवृत्ती आणि नवी आवृत्ती, दोन्हीही एकाच परवान्यात प्रकाशित केले जातात, जेणेकरून मूळ परवान्यातील तरतुदी नव्या आवृत्तीलाही लागू राहतील.


ब्रूस पेरेंस आणि एरिक रेमंड या संगणकतज्ज्ञांनी १९९८ साली ‘दी ओपन सोर्स इनिशीएटीव्ह’ (The Open Source Initiative) ही संस्था कॅलिफोर्नियामध्ये स्थापन केली. याच संस्थेमार्फत ओपन सोर्सचा प्रसार केला जातो. केवळ सॉफ्टवेअरच ओपन सोर्स असते असे नाही. हार्डवेअरही ओपन सोर्स असू शकते. अशा हार्डवेअरची अंतर्गत रचना निर्माता इंटरनेटवर थेट प्रकाशित करतो, ज्यातून इतर वापरकर्ते त्या हार्डवेअरचा अभ्यास करतात आणि त्याला स्वतःच्या गरजेप्रमाणे, बदल करूनही वापरू शकतात.


सर्व फ्री सॉफ्टवेअर्स ओपन सोर्स आहेत; परंतु सर्व ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स फ्री किंवा लिबरे असू शकत नाहीत, कारण सगळेच ओपन सोर्स परवाने ‘म्हणावे तेवढे स्वातंत्र्य/मुक्तता’ देतीलच असे नाही. त्यामुळे फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन ओपन सोर्स दृष्टिकोनाशी पूर्णतः सहमत नाही.

OSI Trademark

दी ओपन सोर्स इनिशीएटीव्ह ट्रेडमार्क (https://opensource.org/)

फ्लॉस सॉफ्टवेअरचे फायदे

१) सॉफ्टवेअर निर्मिती करताना ती खुल्या पद्धतीने केली जाते. अर्थात, जगभरातील कोणतीही व्यक्ती त्या सॉफ्टवेअरच्या संकेतस्थळाला भेट देवून सोर्स कोड पाहू शकते, तो डाऊनलोड करू शकते आणि त्यात बदल करून त्याचा वापर करू शकते/पुनःप्रकाशित करू शकते.

२) एकाच वेळी अनेक लोक एकाच सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी काम करत असतात. हे काम संघटित स्वरूपात चालते आणि त्यामुळे इतर लोकांनी केलेले बदल, नव्या त्रुटी, त्यांच्यावर केलेल्या दुरुस्त्या, परस्पर संपर्क या सर्वांची पक्की नोंद घेतली जाते. याकरिता आवृत्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अर्थात ‘व्हर्जन कंट्रोल सिस्टिम’ (Git किंवा SVN) वापरली जाते. यामुळे काम अधिक वेगाने आणि सुसूत्रतेने होते.

३) अनेक लोकांच्या नजरेतून सोर्स कोड जात असल्याने त्याच्या सुरक्षिततेची आणि कार्यक्षमतेची हमी सामान्य वापरकर्ता घेऊ शकतो. माहितीच्या हाताळणीची आणि तिच्या रक्षणाची तरतूद कशा प्रकारे झालेली आहे हे पाहता येते. यासाठी बाह्य ऑडिट/तपासणी प्रक्रिया राबवता येणे शक्य आहे. प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरच्या बाबतीत अशी तपासणी करता येत नाही.

४) जर एखादी गंभीर त्रुटी आली, तर ती लवकर दुरुस्त होऊन सॉफ्टवेअर अपडेट लगेच मिळायला मदत होते.

५) जगभरातील काही अतिशय तज्ज्ञ लोकांकडून, अभियंत्यांकडून आणि शास्त्रज्ञांकडून फ्लॉस सॉफ्टवेअरमध्ये योगदान दिले जाते. त्यामुळे हे सॉफ्टवेअर उच्च दर्जाचे आणि पारदर्शक असते.

६) निर्मिती आणि कार्य यांतील पारदर्शकतेमुळे वापरकर्त्याला त्याचे सर्व अधिकार मिळतात आणि सॉफ्टवेअर त्याच्या नियंत्रणात राहते. तो आपल्या गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर वापरू शकतो, नवे सॉफ्टवेअर विकसित करू शकतो, ते इतरांना देऊ शकतो.

७) फ्लॉस सॉफ्टवेअरच्या निर्मितीप्रक्रियेत सामील होण्यासाठी प्रोग्रामिंग येण्याची अट नसते. सामान्य वापरकर्ता, इतर माध्यमांतून सूचना देऊ शकतो अथवा बदल सुचवू शकतो, त्या सूचनांचा आणि बदलांचा अभ्यास करून इतर प्रोग्रामर लोक (ज्यांना प्रोग्रामिंग लँग्वेज वापरता येतात असे लोक) त्यांवर काम करू शकतात.

८) फ्लॉस सॉफ्टवेअरच्या निर्मितीचे काम विविध लोक करतात. यातून वैविध्य विकसित होते. धर्म/जात/वंश/लिंग/देश/भाषा यांवरून भेद न होता प्रत्येकाला आपल्या कल्पनांची अभिव्यक्ती करता येते. लोक आपला रोजचा व्यवसाय सांभाळत त्यांच्या गतीनुसार आपले योगदान देऊ शकतात.

९) फ्लॉस सॉफ्टवेअर हे मुक्त परवान्यांअंतर्गत प्रकाशित केले जात असल्याने त्याच्या वापरासाठी कोणतीही फी भरावी लागत नाही.

१०) कोठेही सहज उपलब्ध झाल्यामुळे त्याला लगेच प्रतिस्थापित अर्थात इंस्टॉल करता येते. बहुतांशी मोफत स्वरूपात असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर जगभरात अनेक कामांसाठी केला जातो.

११) बहुतांशी फ्लॉस सॉफ्टवेअरमधून कोणत्याही प्रकारची माहिती गोळा केली जात नाही. जर केलीच जात असेल, तर संबंधित माहितीच्या हाताळणीची सर्व प्रक्रिया तपासता येते.


फ्लॉस सॉफ्टवेअरचे तोटे

१) फ्लॉस सॉफ्टवेअर वापरत असताना जर वापराशी निगडित काही समस्या आल्या, तर त्यासाठी मदत अथवा सपोर्ट ज्या त्या वेळी मिळेलच असे नाही, कारण लोक त्यांच्या सोईनुसार काम करत असतात. त्याचप्रमाणे सपोर्ट साठी वेगळी तरतूद असेलच असे नाही.

२) काही हार्डवेअर निर्माते त्यांच्या हार्डवेअरवर त्यांनी इंस्टॉल केलेल्या सॉफ्टवेअर व्यतिरिक्त दुसरे कोणतेही सॉफ्टवेअर वापरता येऊ नये, याची काळजी घेतात. त्यामुळे सर्व हार्डवेअर्सवर फ्लॉस सॉफ्टवेअर चालेलच असे नाही.

३) फ्लॉस सॉफ्टवेअर लोकांच्या सहभागातून निर्माण केले जाते. त्यामुळे त्या निर्मितीप्रक्रियेत सातत्य असेल असे नाही. कधीकधी लोकांना त्यांच्या वैयक्तिक कामातून सॉफ्टवेअर निर्मितीसाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया संथ होते आणि मागे पडत जाते.

४) फ्लॉस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पैसे मिळवणे हा हेतू गौण असतो. परंतु कोणत्याही प्रोग्रामर व्यक्तीला त्याच्या कष्टासाठी आणि वेळासाठी मोबदला मिळणे आवश्यक असते. त्यामुळे मग वापरकर्त्यांकडून देणगी स्वरूपात आर्थिक मदत मागितली जाते. देणगी देणे हे ज्याच्या त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. बहुतांशी लोक देणगी देत नाहीत. त्यामुळे सॉफ्टवेअर निर्मिती करणे परवडत नाही. त्यामुळेदेखील ही प्रक्रिया संथ होते आणि मागे पडत जाते.

५) फ्लॉस सॉफ्टवेअरमध्ये प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरप्रमाणे अत्याधुनिक फीचर्स असतीलच असे नाही. अत्याधुनिक फीचर्स निर्माण करण्यासाठी आर्थिक पाठबळ आणि वेळ या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. कधीकधी तांत्रिक कौशल्यांची आवश्यकता भासते. या सर्व गोष्टी वेळेत उपलब्ध होतीलच असे नाही. त्यामुळे फीचर्सच्या बाबतीत फ्लॉस सॉफ्टवेअर हे प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरच्या तुलनेत मागे पडू शकते.

६) सर्वच गंभीर त्रुटी वेळेत लक्षात येतील असे नाही. काही फ्लॉस सॉफ्टवेअर्स निर्माते सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या करू शकत नाहीत. त्यातून गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

७) फ्लॉस सॉफ्टवेअरचा वापर करणारा बहुतांशी वर्ग तांत्रिक कौशल्यांच्या बाबतीत सक्षम असतो. त्यामुळे हे सॉफ्टवेअर इंस्टॉल करणे आणि वापरणे तांत्रिकदृष्ट्या अवघड असू शकते. अर्थात हे सगळ्या फ्लॉस सॉफ्टवेअर्सना लागू पडत नाही.


आपण आपल्या रोजच्या जीवनात फ्लॉस सॉफ्टवेअरचा कळत-नकळत वापर करतच आहोत. आपण वापरत असलेला ‘अँड्रॉईड’ हा एक फ्लॉस सॉफ्टवेअर आहे. बहुतांशी लोकांना माहीत असलेले ‘व्हिडिओलॅन मीडिया प्लेअर’ (VLC Media Player) देखील फ्लॉस सॉफ्टवेअर आहे. इतकेच नव्हे, तर इंटरनेटच्या कार्यासाठी आवश्यक असणारे बहुतांश सॉफ्टवेअर फ्लॉस आहे. तुम्ही ज्या सर्व्हरवरून टेकमयोसी वाचत आहात, त्या सर्व्हरवरही काही प्रमाणात फ्लॉस सॉफ्टवेअर वापरले जात आहे.

थोडक्यात, लोकांनी लोकांसाठी लोकांच्याच योगदानातून निर्माण केलेले सॉफ्टवेअर म्हणजे फ्लॉस, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. समाजाच्या प्रगतीसाठी सॉफ्टवेअरचा मुक्तपणे वापर आणि नवनिर्मिती व्हावी, सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर लोकांना त्यांच्या गरजेप्रमाणे करता यावा आणि प्रत्येक माणसासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान खुले व्हावे, या उदात्त उद्देशानेच आज फ्लॉस सॉफ्टवेअरची यशस्वी घोडदौड सुरू आहे.


या लेखासाठी खालील संदर्भ वापरले गेले:

१) History of free and open-source software, https://en.wikipedia.org/w/index.php?title=History_of_free_and_open-source_software&oldid=1162363354 (last visited Aug. 02, 2023)

२) What is Free Software?, https://www.gnu.org/philosophy/free-sw.html (last visited Aug. 02, 2023)

३) The Open Source Definition, https://opensource.org/osd/ (last visited Aug. 02, 2023)

४) The open source way, https://opensource.com/open-source-way (last visited Aug. 02, 2023)

५) Copyleft, https://en.wikipedia.org/w/index.php?title=Copyleft&oldid=1166917498 (last visited Aug. 02, 2023)

६) Why Open Source Misses the Point of Free Software, https://www.gnu.org/philosophy/open-source-misses-the-point.html (last visited Aug. 02, 2023)

या लेखाविषयी आपल्या सूचना/प्रतिक्रिया संपर्क पृष्ठावरून कळवू शकता. आपल्याला हा लेख आवडला तर शेअर नक्की करा..!